परिचय

स्वागत अध्यक्ष — महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२६

मा. सुप्रिया देवस्थळी या Indian Civil Accounts Service (ICAS) मधील वरिष्ठ अधिकारी असून सध्या त्या सह महालेखानियंत्रक, भारत सरकार या पदावर कार्यरत आहेत. जन्म आणि शिक्षण मुंबईत. मानसशास्त्र या विषयात सुवर्ण पदकासह मुंबई विद्यापीठातून पदवी, तर औद्योगिक मानसशास्त्र या विषयात मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

२००१ मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून इंडियन सिव्हिल अकाउंट्स सर्व्हिसमध्ये निवड झाली. गेली पंचवीस वर्षे त्यांना भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये कामाचा अनुभव आहे.

महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बंध

महिला अधिकाऱ्यांचे कर्तृत्व, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती अशा विषयांवर लेखन होत असते. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, एकत्र काम आणि महिलांचे एकमेकांशी बंध कशा प्रकारचे असतात याविषयी सुप्रिया देवस्थळी यांनी केलेले चिंतन विशेष महत्त्वाचे आहे.

पंचवीस वर्षांच्या सरकारी नोकरीत त्यांना पुरुष तसेच स्त्री बॉसबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला आहे. सहकाऱ्यांमध्येही पुरुष आणि बायका दोन्ही होते. अधिकारी मंडळींसाठी बॅचमेट्स हा एक महत्त्वाचा गट असतो. बायकांना इतर बायकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात — त्याचे विवेचन त्यांनी केले आहे.

बायकांचे एकमेकांशी असणारे बंध हे साधेसरळ नसतात. बायका विचार करणाऱ्या, कधी-कधी अती विचार करणाऱ्या असतात, काळजी करणाऱ्याही असतात, भावूक असतात, आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या असतात, कधी दुसऱ्या बाईचा हेवा करणाऱ्या, मत्सर करणाऱ्याही असतात. या व्यामिश्रतेमुळेच ते अधिक सखोल आणि अर्थपूर्ण असतात.

शासकीय यंत्रणेतल्या असोत किंवा खासगी यंत्रणेतल्या असोत, महिलांच्या एकमेकांकडून अपेक्षा थोड्या जास्तच असतात. एखाद्या बाईची बॉस बाई असेल तर तिला घर, संसार आणि कामावरच्या जबाबदाऱ्या याची कल्पना असावी अशी अपेक्षा असतेच असते.

कामाच्या ठिकाणी महिला एकमेकींना आधार देतात का? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे 'हो' असे आहे. बायका एकूणच एकमेकींशी बोलणे, घरगुती चर्चा करणे, वैयक्तिक गप्पा मारणे या गोष्टी करत असतात. त्यातून एक जाळे तयार होते जे संकटकाळी उपयोगी पडते. अधिकारी पदावरच्या बायकांना राजकीय दडपण, वरच्या पदासाठी होणाऱ्या स्पर्धा आणि संघर्ष याचाही सामना करावा लागतो. महिला अधिकाऱ्यांसाठी आपल्या बॅचमेट्स हा अनेकवेळा मोठा आधारस्तंभ असतो.

"दोन बायकांचे एकमेकांशी जमत नाही" या विधानात फारसे तथ्य नाही असे सुप्रिया देवस्थळी यांचे मत आहे. कोणत्याही दोन पुरुषांचे एकमेकांशी जमण्याच्या किंवा न जमण्याच्या जितक्या शक्यता असतात तितक्याच शक्यता दोन बायकांच्या. महिलांचे परस्परांशी असणारे संबंध इतर अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यात हेवेदावे, प्रेम, काळजी, राग, मत्सर, असूया, अनुकंपा, सहानुभूती असे सर्व पदर असतात.

साहित्यिक प्रवास

महाविद्यालयीन काळापासून लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स ही वर्तमानपत्रे, तसेच अनुभव, साप्ताहिक सकाळ अशा नियतकालिकांत आणि दिवाळी अंकांमध्ये विविध विषयांवर सातत्याने लेखन करत आल्या आहेत. खास बालकुमारांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या "वयम" या मासिकासाठी विविध विषयांवर लेखन केले आहे.

दिल्लीतील "दिल्ली मराठी प्रतिष्ठान" आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांची संस्था "पुढचे पाऊल" या संस्थांच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

"दिल्ली डायरीज" हे त्यांचे पहिले पुस्तक आहे. बदली होऊन त्या दिल्लीत आल्या. मराठी माणसाचा दिल्लीशी जुळवून घेण्याचा प्रवास आणि या प्रवासातली निरीक्षणे, अनुभव त्यांनी "दिल्ली डायरीज"मध्ये लिहिले आहेत.